Showing posts with label anatomy. Show all posts
Showing posts with label anatomy. Show all posts

Sunday, September 13, 2015

आठवणी- ४

Anatomy चे इतर भाग मला फार आवडायचे - त्यात embryology आणि genetics होते. या विषयांची आमची अभारतीय पुस्तकही फार छान होती.डॉ. अय्यर embryology शिकवत असाव्यात - अस अंधुकस आठवतंय- खूप छान शिकवायच्या आणि होत्याही खूप छान - अगदी हसतमुख . डॉ .क्रिष्णा genetics शिकवायचे-त्यांचे ( south इंडिअन) उच्चार पटकन समजायचे नाहीत.एकदा त्यांच्या पिरियडला मी पहिल्या बेंचवर बसून झोपा काढत होते म्हणून मला ओरडले होते ! ( एकंदरीत झोपेच दुखणं फार जुनं ! )



 पहिल्या वर्षीचा तिसरा विषय म्हणजे Biochemistry ! माझा अत्यंत नावडता विषय !! तेव्हा जर मला कळल असतं की हाच विषय माझा उपजीविकेच साधन होणार आहे तर मी त्याकडे अधिक लक्ष दिल असत  !! ( म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर....बोलण्या सारखच आहे ! )खरं तर इतका रटाळ विषय नाही दुसरा medicine मध्ये ! मला कधी तो समजलाच नाही . फार थोडे शिक्षक आठवतायत- तेही फारसे inspiring नव्हते. परीक्षेतही दांडी गुल होता होता राहिली. माझ त्या paper ला घड्याळ बंद पडलं- शेवटी कसबसं - अगदी खराब अक्षर काढत- तो paper पूर्ण केला. हं- तसा अभ्यासही झाला नव्हता - कारण उद्या शेवटचा paper या विचाराने मला आनंदाच्या इतक्या उकळ्या फुटत होत्या की मी मन एकाग्र करूच शकत नव्हते . त्यात गरब्याचे दिवस ! त्यावेळी आमच्या सोसायटीत खूप मोठ्या प्रमाणावर दांडिया व्हायचा - त्यामुळे प्रचंड आवाजही मला ( अभ्यास न करण्यासाठी ) मदत करत होता !

बाकीचे papers , परीक्षा काही केल्या आठवत नाही- practicals ही नाहीत.Term exams च्या आधी धडधडण आठवतंय आणि संपल्यावर - फक्त परीक्षा संपल्याचा आनंद आठवतोय ! सर्व परीक्षा मी पास तर झाले पण कधी चमकले नाही. शाळेत  'आपण हुशार आहोत  ' अस वाटण ,  कधी  'आपण अगदी ढ आहोत '  यात बदललं कळलही नाही - इंग्लिश बोलण्याबद्दलचा न्यूनगंडही होताच .

MBBS मध्ये गेल्यावर पहिल्यांदा train चा प्रवास सुरु झाला. त्या आधी मी ठाण्यातच शिकत होते. आईने मला ट्रेन प्रवासाच्या आधी खूप instrutions दिलेली आठवतात - आपली नेहमीचीच - पिढ्यानपिढ्या आया देत आल्यात तशीच ! ठाणे ते सायन मस्त झोप काढायचे - ( माझ्या गोष्टीत झोप वारंवार येते - जशी मला येते तशीच ! )   पहिल्या दिवसापासून माधुरी आणि मिताली माझ्याबरोबर असायच्या. मग पुढे पुढे आमचा central रेल्वे वाल्यांचा मोठठा ग्रुपच झाला . हळू हळू सर्वांची ओळख झाली आणि आमची batch किती छान , साधी, सरळ आहे हे कळल .

आणखी काही ठळक आठवणी पहिल्या वर्षीच्या -

Social - हे नावच मी इथे येऊन ऐकलं . उत्सुकता होती काय असत त्याची. त्यासाठी रात्री यावं लागणार होतं . हे पहिल social आमच्या senior batch ने आमच्या साठी दिल होतं . सर्वच socials अगदी २-३ वाजेपर्यंत चालायची . त्यानंतर पहाटेच्या पहिल्या ट्रेनची वेळ होईपर्यंत इथे तिथे वेळ काढायचा. ( जेव्हा मी hostel मध्ये राहत नव्हते तेव्हाची गोष्ट ) पहिल्या socialमध्ये मी वर्गात धड कोणालाही ओळखत नव्हते - ते college सुरु झाल्यावर लगेच झाल होतं -  पण तरीही मजा आली होती - एक नवा अनुभव होता - रात्रभर नाचण्याचा - ( पुढे दोन दिवस पाय दुखत होते खूप ) काही games , dinner - पण एकंदरीत ओळख करून घेण्यासाठी - social interaction वाढवण्यासाठी म्हणून ते social ( असावं ) मराठी शाळेतून आलेल्या मला थोडा cultural shock असला तरी या पुढची , फक्त आमच्या वर्गाची socials मी खूप enjoy केली.

LTMMC Day साठी झालेली माझी audition - माझ्या मते मी चांगली गायले होते , पण तरीही माझी निवड  झाली नव्हती. माझी जवळची मैत्रीण मितालीची निवड  झाली -  त्यासाठी थोडा आनंद आणि थोडी असूया वाटलेली आठवते ! ( मी " ओ सजना " म्हटल होतं . )


पहिला college फेस्टिवल ज्यातलं फार काहीच आठवत नाही , फक्त एक दिवस थांबून  " तेजाब " सिनेमा पहिला होता. तसाच पहिल monsoon  melodies - पण त्यात मी बहुदा गायले नव्हते .

 पहिला वहिला College day - ज्यात आम्हाला आमच्या seniors ने जे सांगितलं तेच गाणं म्हणायच अशी सक्ती होती. मी , मिताली , आणि उमा - आम्ही तिघींनी " गजर ने किया है इशारा ' हे गाणं - तेही बाळबोध ,  साड्या बिड्या नेसून म्हटल !  गाणं बर झाल  खरं , पण मला ते कधीच फारस आवडलं नाही . ( ही वेशभूषाही seniors चीच idea होती का ? )

Guardian Teacher - ही नवी संकल्पना त्यावर्षी सुरु झाली होती आमच्या college मध्ये ( medical college मधल्या मुलांना फार दडपण येतं - मग त्यांना , त्यांच्या समस्यांबद्दल  बोलण्यासाठी , प्रत्येक batch ला एक शिक्षक नेमले होते . आमच्यासाठी होत्या डॉ. पंतवैद्य - ( त्या  Anesthesiology च्या professor होत्या ) . आमच्यापैकी कोणीच त्यांच्याकडे कसल्याही समस्या घेउन गेलं नाही ! पण त्यांनी आम्हाला गुरुकृपा मध्ये पाणीपुरी आणि मग  Black Current icecream  खायला ( कुठे ते आठवत नाही ) नेल. माझ्यापुरत बोलायचं तर मी हे दोन्ही प्रकार पहिल्यांदाच खाल्ले .  पण त्यानंतर आजतागायत मागे वळून पाहिल नाहीये ! त्यामुळे आजच्या  माझ्या स्वरूपाचं श्रेय त्यांना द्यायला हरकत नाही !  जाता येतं आम्ही चालत जायचो - सायन हॉस्पिटलच्या मागच्या गेटमधून आत जायचो - जाता येता खादाडी करायचो !

पहिल्या वर्षीच्या परीक्षेचं सेन्टर वडाळ्याला होता ( कॉलेजच नाव काय बर होत ? ) येताना आई न्यायला यायची - प्रचंड गर्दी गाडीत - कारण ती ऐन गर्दीची वेळ  - जीव मुठीत धरून चढायचो . practicals मुळीच आठवत नाहीत. ही कहाणी ऑगस्ट ९० -डिसेंबर ९१ पर्यंतची .


अशा रीतीने पहिल्या वर्षीची कहाणी सुफळ संपूर्ण जहाली !





Wednesday, August 26, 2015

आठवणी-३

पहिल्या वर्षीचा दुसरा विषय म्हणजे Anatomy.


Anatomy मध्ये अनेक भाग होते- त्यातला एक भाग म्हणजे dissection . खरं म्हणजे तो एक  प्रचंड धक्काच असतो आपल्या senses ना ! ती अंधारी dissection room , तिथे पसरलेला तो विचित्र वास ,( जो फोर्मालीन चा  होता )आणि विविध आकार आणि रंगांचे मृतदेह. पहिले काही दिवस कोणालाही जेवणच जायच नाही - कितीही धुतले तरी हातांचा तो वास ….दरवळत राहायचा ! माझं पहिल dissection हे lower /inferior extremity  ( Infex )अर्थात  पायाचं होतं.माझ्या वाट्याला एक अतिशय लठ्ठ बाई आली होती- जिच्या अंगावर एवढी चरबी होती की त्यातून एखादी nerve किंवा blood vessel शोधण फार म्हणजे फारच कठीण काम !  त्यातून आत्तापर्यंत  सर्व काही “ शिकवले  तरच समजते “ही पक्की खात्री ! त्यामुळे कोणी शिकवणार नाही म्हणजे अतिशय हेल्पलेस वाटायच ! स्व अभ्यास ही संकल्पना डोक्यातही आली नव्हती. dissection हा प्रकार ( Cunningham नावाचा खरं तर खूप चांगल पण त्यावेळी फ्रेंच-ग्रीक  वाटणारं ) textbook वाचूनच करायचा ही teachers ची पक्की समजूत झाली होती..


शिक्षकही थोडे दिव्य होते- अगम्य उच्चार , दुर्बोध शिकवणं, अचाट इंग्रजी आणि तोंडात सतत सिगारेट ! Infex मला कधीही नीट समजलं नाही ! पुढे पुढे मात्र  “ चौरसिया” नावाच आपल्या मातीतल पुस्तक मिळाल ( जे अक्षरशः एखाद्या गाईड प्रमाणे होतं ) आणि पास होण्यापुरत anatomy यायला लागलं ! सर्वच विषयांची भारतीय पुस्तक मिळाल्याने आम्हा students ची थोडीफार सोय झाली !


superior extremity ( supex) म्हणजेच हात - या dissection ला मात्र चांगले शिक्षक मिळाले, कोणीतरी surgeon होते- नाव आठवत नाही आता-पण आपल्यालाही समजू शकतं असा वाटायला लागलं.thorax ( chest) ला डॉ. शेजवलकर होत्या -त्या lectures मध्ये Genetics शिकवायच्या.- त्यांचाही शिकवणं समाजत असे मला…..थोड्या कापऱ्या- रडक्या आवाजात गाणं म्हणणाऱ्या ( पण त्या सुरात गायच्या एवढा नक्की ! ) -त्यांनी मला एकदा dissection नंतर गाणं म्हणायला लावलेला आठवतंय .( तेव्हा मला गायचा अजिबात confidence नव्हता-मी चांगली गाते असा मला मुळीच वाटायच नाही ! ) त्या स्वतःही एका LTMMC Day ला गायल्या होत्या - ( जिया ले गयो जी मोरा)


पहिल्या भागाला आलेल्या अगम्य शिक्षकांनी मला बराचसा dissection शिकवल( किंवा नाही शिकवलं ! ) त्यामुळेच हा BMR ( basic में राडा ) नावाचा रोग माझ्या वाट्याला आला अशी माझी पक्की खात्री आहे ! ( आता बोलायला काय जातंय ! )


Anatomy साठी आम्हाला Bone set अर्थात हाडांचा सापळा घ्यावा लागे.-तो एक स्वतंत्र अभ्यासच होता- ती हाड शरीरात कशी असतात त्याप्रमाणे धरून दाखवा -अर्थात anatomical position हा प्रत्येक viva मध्ये ठरलेला प्रश्न - ज्याच उत्तर प्रत्येक विद्यार्थी वेगळ द्यायचा ( अर्थात ह्यातही हुशार मुलांच exception होतच ) माणसामाणसामधील वैविध्याचा तो आम्ही घेतलेला मागोवा होता ! ( आमच्या परीने ! ) ट्रेन मध्ये , गर्दीत,ती हाडं हळूच काढून आम्ही अभ्यास करण्याचा नाटक करत इतर प्रवाशांना घाबरवलेल आहे !


Train वरून आठवलं- ट्रेन सुरु झाली की मी नेहमी गाढ झोपून जायचे-आणि उरलेली झोप वर्गात पूर्ण करायचे ! अगदी थोडी हवा जरी लागली तरी डोळे मिटण्याची ती सवय अजूनही कायम आहे !