Friday, August 28, 2015

थोरो-एका लेखावरील लेख !

मागे दीपावली दिवाळी अंकात 'थोरोचे विश्व' हा अनिल अवचटांचा लेख वाचनात आला -अतिशय आवडला , खर तर तेव्हापासून मनात होते की की कधीतरी आपणही लिहावं थोरोवर -अर्थात ह्या लेखावर -कारण प्रत्यक्ष थोरो काही वाचू शकले नाही अजून.तसे एकदा इंग्रजी ओरीजीनल आणि एकदा दुर्गाबायींचे 'वाल्डेनकाठी विचारविहार 'आणून वाचायचा प्रयत्न केला-पण जमलं नाही.कदाचित माझी बुद्धी तोकडी पडली असेल ...किंवा प्रगल्भता. कदाचित कठिण भाषेत लिहिलेले उत्तम विचार  क्लिष्टतेच्या पलीकडे जाऊन समजून घेण्यासाठी जी एकाग्रता लागते ती कुठेतरी कमी पडली असेल...वाचू शकले नाही एवढा मात्र खरं ! अर्थात  मी पुन्हा कधीही ते वाचणार नाही असा मात्र नाही ....."पुन्हा कधीतरी" असं म्हणून ते मी बाजूला ठेऊन दिलय एवढच !

थोरो हा विचारवंत ह्या लेखातून जेवढा भेटला-अतिशय भावला .आपले सर्व उद्योग सोडून वाल्डेन नावाच्या तळ्याकाठी ,एका जंगलात दोन वर्ष राहणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही.कमीतकमी गरजा ठेवून जीवन हेतुपुरस्सर जगणे फक्त हाच उद्देश.कुठलाही agenda न बाळगता येईल तो दिवस जगत राहणे-मस्त कल्पना !! त्याने स्वतःच्या हाताने आपले एक झोपडीवजा घर बांधले-स्वतःपुरते अन्न उगवून खायचा -निसर्ग निरीक्षण करायचा.आजच्या स्पेशलायझेशनच्या जमान्यात खूप विचित्र वाटेल अशी एक गोष्ट थोरो सांगतो-"( घर बांधण्याचा ) हा आनंद आपण ( स्वतः घेण्याऐवजी ) सुताराला का देतो ?" खरच , आउटसोर्सिंगच्या जमान्यात आपण काही  आनंद मात्र नक्कीच  घालवून बसलोय !

 तिथल्या प्राणीमात्रांशी त्याने दोस्ती केली होती.पहाटेपासून तो घराबाहेर पडायचा- सूर्याच्या सोबतीने दिवस घालवायचा -सर्व ऋतूत निसर्ग निरीक्षण करून त्याने अगदी बारीक सारीक नोंदी ठेवल्या होत्या - फक्त निसर्ग निरीक्षणे नव्हे तर त्याने केलेल्या कामांच्या सुद्धा.

एकांतवासात दोन वर्षे घालवणे सोपे काम नाही- आपल्याला स्वतःच्या मनातील विचारांना सामोरे जावे लागते. आजकाल आपण एकटे वाटू नये म्हणून काय वाट्टेल ते करतो- TV पाहतो, सोशल मिडिया तर आहेच पण त्याखेरीज अनेक व्यसनं सुद्धा ! फक्त आपला आतला आवाज दाबण्यासाठी ! पण थोरो तर म्हणतो " एकांतवासाहून चांगला  मित्र नाही ! " कुठेतरी मनाला हा विचार खूप स्पर्शून गेला.

थोरोची शिक्षणविषयक दृष्टीही अचाट होती- पुस्तकी ज्ञानापेक्षा ,हाताने काम करत , अनुभव घेत, आलेले प्रश्न सोडवत प्रगती करत राहणे श्रेष्ठ ! home schooling मध्ये काहीस अस करत असावेत ! भारतात ही संकल्पना नाहीये.आपल्याकडे मोठ्ठ्या डिग्र्या मिळवून लठ्ठ पगाराची नोकरी मिळवणं म्हणजे गगनाला गवसणी घालणं ! (खरच , उत्तम व्यवसाय  करण्यासाठी MBA ची डिग्री खरच जरुरी असते का ?)

" अधून मधून आजारी पडणं हे आरोग्यासाठी बऱ असत ! " आणि अधूनमधून अपयश येणं हे मानसिक आरोग्यासाठी ! अलीकडची सेल्फ हेल्प पुस्तक मात्र सांगतात- " Make winning a habit " हे जे अपयश असत, ते introspect करायला लावतं ; एखादी स्टेप मागे जाऊन पुन्हा एकदा broad perspective ने बघायला भाग पाडतं, पाय जमिनीवर आणत. यश handle करण्यासाठी अपयशही तितकंच गरजेचं आहे !

त्या द्रष्ट्याला जणू येणाऱ्या युगातील consumerism बद्दल कळल होतं - तो म्हणतो " आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा खरं तर ती वस्तूच आपल्याला विकत घेत असते .जो प्रकाश डोळे दिपवतो तो खरं तर अंधारच असतो ! " वस्तू नकोत तर जीवन समृद्ध करणारे अनुभव हवेत...सामान्य नामे नकोत -भाववाचक नामे हवीत- प्रेम,मैत्री,जिव्हाळा,विश्वास,श्रद्धा....दिसत नाहीत, विकतही घेता येत नाहीत... True joy is always free ! Best things in life are free !!

असा खूप काही छान सापडलं मला या लेखात- कधीही उदास वाटत असला म्हणजे मी हा लेख वाचते- मन प्रसन्न होतं. थोरो आणि माझी  गाठ घालून देणारे अनिल अवचट दोघांचेही आभार !

( खरं तर या लेखात अजूनही  खूप काही आहे-पण तो लेख वाचून अनुभवायला हवा .
संदर्भ : ' थोरोचे विश्व " दीपावली , दिवाळी अंक २००८ - अनिल अवचट .
आता हा लेख पुस्तकातही प्रसिद्ध झालाय.)






No comments:

Post a Comment